बिल्डरला सावकारी जाच... ५ लाखांच्या बदल्यात १६ लाख उकळले

Foto

छत्रपती संभाजीनगर (सांजवार्ता ब्युरो) : अवैध सावकारी गुंडांच्या टोळीकडून व्याजाने पैसे घेणे शहरातील बांधकाम व्यावसायिकाला चांगलेच महागात पडले. १० टक्के व्याजाने ५ लाख रुपये घेतले होते. सावकारी गुंडांनी ५ महिन्यांत मूळ रकमेसह १६ लाख रुपये व्याज उकळले. नंतर धमकावून आणखी १६ लाख ५० हजारांची मागणी केली. गावाकडील अडीच एकर जमीनही हडपली. ती परत करण्यासाठी आणखी १६ लाख रुपयांची मागणी केली. बिल्डरचे तीन वेळा अपहरण केले, दिवसभर मारहाण करत होते. बुधवारी (दि.११) रात्री पुंडलिकनगर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.
लखन राजू साबळे (वय ३३), विकी देविदास शिंदे (वय ३३, दोघे रा. ब्रीजवाडी), प्रशांत बंडू ढाकणे (वय ३२, रा. विठ्ठलनगर, रामनगर) आणि व्यंकटेश राजू ढगे (वय २८, रा. भारतनगर, उत्तरानगरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या अवैध सावकारांची नावे आहेत. पैकी लखन साबळे व विकी शिंदेला अटक करण्यात आली. बांधकाम व्यावसायिक विश्वजित देशमुख (वय २९, रा. एन ४ सिडको) यांनी या प्रकरणात तक्रार दिली. २०२४ मध्ये देशमुख यांनी लखन साबळेचा भाऊ किरण साबळेच्या घराचे बांधकाम केले. त्यावेळी देशमुख यांची लखनसोबत ओळख झाली होती. एप्रिल २०२४ मध्ये आर्थिक अडचण असल्याने देशमुख हे व्याजाने पैसे देणार्‍याच्या शोधात होते. त्यावेळी लखनने त्यांना प्रतिमाह १० टक्क्यांनी पाच लाख रुपये देत चार कोरे धनादेश, कोर्‍या बॉण्डवर सह्या घेतल्या. त्यानंतर साबळेने पाचच महिन्यांत देशमुख यांच्याकडून मूळ ५ लाखांसह १६ लाख रुपये व्याज उकळले. मात्र, काही दिवसांत अजून १६ लाख ५० हजार रुपये व्याज मागत धमकावयाला सुरुवात केली. देशमुख यांची करंजखेडची अडीच एकर जमीन नावावर करून देण्याची मागणी केली. ५ डिसेंबर २०२४ रोजी प्रशांत ढाकणेच्या कारमध्ये बसवून कन्नडला नेले. पैशांऐवजी शेतजमीन व्यंकटेश ढगेच्या नावावर करण्यासाठी धमकावले. देशमुख यांनी नकार दिल्यावर चिकलठाण्यातील एका बंद कंपनीत दिवसभर डांबून ठेवले. विकी शिंदे याने देशमुख यांच्या वडिलांना धमकावून विविध साडेचार लाख रुपये उकळले. काही दिवसांपूर्वी पुन्हा दोन वेळेस देशमुख यांना दिवसभर चिकलठाण्यातील बंद कंपनीत ठेवून मारहाण केली. कुटुंबाला बेअब्रू करण्याचीही धमकी दिली. तपास पोलीस निरीक्षक अशोक भंडारे करीत आहेत.